
लोकशासन – प्रतिनिधी:इंदापुर ग्रामीण
इंदापुर (ता.०३) : उद्धट येथील उदमाईदेवी यात्रेत सुट्टे पैशांच्या किरकोळ वादातून एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.१) उशिरा रात्री घडली. या प्रकरणी आईस्क्रीम गाडी चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादा रावण इंगळे (वय २३, रा. उद्धट, ता. इंदापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर किसन शंकरलाल प्रजापती (सध्या रा. बरड, ता. फलटण, जि. सातारा; मूळ रा. राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुरज हिंमत तुपे (वय २३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उदमाईदेवी यात्रेनिमित्त ते व त्यांचा मित्र दादा इंगळे हे मंदिर परिसरात फिरत होते. यावेळी उदमाई मॉलसमोरील भैरवनाथ आईस्क्रीम गाडीवर फालुदा खाण्यासाठी गेले असता, सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून विक्रेत्यासोबत वाद झाला. वाद चिघळल्याने आरोपी प्रजापती याने दादा इंगळे याला शिवीगाळ करत जोरात ढकलून दिल्याचा आरोप आहे.या धक्क्यामुळे इंगळे रस्त्यावर पडले आणि त्यांचे डोके डांबरी रस्त्यावर आपटल्याने गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.
दादा इंगळे हा मेहनती व कष्टकरी तरुण होता. कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. त्याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार असून, त्याच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्याच्या जाण्याने आई व भाऊ पोरके झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तसेच वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डूणगे अधिक तपास करत आहेत.