सर्वपक्षीय कर्मयोगी पॅनेल उभारण्याचा निर्धार; इच्छुक सभासदांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन

लोकशासन – प्रतिनिधी : इंदापूर ग्रामीण
इंदापूर : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, निवडणूक अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली असतानाही प्रमुख राजकीय पक्षांकडून अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर झालेली नाही. त्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच माजी खासदार कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे पुतणे तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी निवडणुकीत उतरण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. “कर्मयोगीची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. सभासदांना त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित राहू देणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
इंदापूर तालुक्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत मोठे बदल झाले आहेत. एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक असलेले भरणे आणि पाटील गट एकत्र आले आहेत. दुसरीकडे, माने आणि गारटकर यांनी भाजपसोबत राजकीय समीकरणे जुळवली. इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत माने आणि गारटकर यांना सोबत घेऊन लढणारे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये वरिष्ठ पातळीवरील राजकीय घडामोडींनंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत हातमिळवणी केली. या राजकीय समीकरणांचा परिणाम तालुक्यातील सत्तासंघर्षावरही दिसून आला.
या पार्श्वभूमीवर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली असतानाही राजकीय पक्षांकडून हालचाली दिसत नसल्याने सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार की निवडणूक बिनविरोध होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कर्मयोगी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांची ऊसबिले, कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच ऊसतोडणी टोळीधारकांची देणी असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने संबंधित घटक आर्थिक अडचणीत सापडल्याची परिस्थिती आहे. अशा वेळी कारखान्याच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याऐवजी राजकीय नेते निवडणुकीबाबत मौन बाळगत असल्याबद्दल मयूरसिंह पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. कारखान्यावर अवलंबून असलेल्या शेतकरी, कर्मचारी आणि इतर घटकांच्या भवितव्याचा विचार कोण करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सभासदांनी वेळ न दवडता उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन मयूरसिंह पाटील यांनी केले आहे. सर्वपक्षीय सभासदांना एकत्र आणून सर्वपक्षीय कर्मयोगी पॅनेल उभारण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभासदांनी विश्वास दाखविल्यास कारखान्याचे खरे मालक असलेल्या शेतकऱ्यांसह कर्मचारी, ऊसतोडणी कामगार आणि कारखान्यावर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना मतदानाचा हक्क बजावता यावा आणि कारखान्याच्या कारभाराबाबत आपली भूमिका मांडण्याची संधी मिळावी, यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मयूरसिंह पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे कर्मयोगी कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार की सर्वपक्षीय पॅनेलच्या माध्यमातून चुरशीची लढत रंगणार, याकडे आता सभासदांसह इंदापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688