
लोकशासन – प्रतिनिधी: किरण माने, शेळगाव
शेळगाव : (ता.१०) प्रधानमंत्री आवास योजना,मोदी आवास योजना,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना,रमाई आवास घरकुल योजना,यशवंत घरकुल योजना या सर्व योजनांचे इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचे कामे अद्यापही सुरु केलेली दिसत नाहीत तरी संबंधित लाभार्थीनीने तातडीने घरकुलाची कामे सुरु करून दिलेल्या वेळेत पूर्ण करा अन्यथा पंधरा दिवसात जर घरकुलाची कामे सुरु न केल्यास मंजूर घरकुल हे रद्द करण्यात येईल असा इशारा इंदापूर तालुक्यातील मंजूर घरकुल लाभार्थीना इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी दिला आहे.
शेळगाव (ता.इंदापूर) येथे शुक्रवार (दि ९) रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सुरु असलेल्या विविध योजने अंतर्गत सुरु असलेल्या घरकुल कामांची पाहणी गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत जगताप यांचे समवेत मोटारसायकल वरून प्रवास करत वाड्यावस्तीवरती प्रत्यक्ष ९० घरांना भेटी दिल्या.
शेळगाव ग्रामपंचायतने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला असून या अभियानामध्ये घरकुल योजनेकारिता आठ गुण आहेत आणि हे गुण मिळवण्यासाठी ३१ मार्च २०२६ पूर्वी गावात सुरू असलेली शंभर टक्के घरकुल पूर्ण करावेत असे आव्हान शेळगाव येथील लाभार्थ्यांना ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी केले आहे.