
लोकशासन- प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा
रत्नागिरी जिल्ह्यात लागू असलेल्या मनाई आदेशामुळे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने नियोजित चक्का जाम आंदोलन रद्द करून त्या ऐवजी लांजा येथे मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवार २४ जुलै रोजी घोषणाबाजी करत लांजा तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन शासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त करण्यात आला.
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी शासनाकडे शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग मानधन वाढ व अन्य विविध प्रश्नांसंदर्भात संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत शासनाकडून अद्यापही कोणताही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिलेला होता,त्यानुसार रत्नागिरी जिल्हा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने लांजा मध्ये चक्का जाम आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लागू करण्यात आलेल्या मनाई आदेशामुळे आंदोलनकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत महामार्गावर ठिय्या देण्याऐवजी जोरदार घोषणाबाजी करत आपला विरोध नोंदवला.

यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने लांजा तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर केले. यावेळी निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी व महसूल नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे यांना निवेदन देण्यात आले. तसेच दिव्यांगांच्या मूलभूत गरजा, सवलती व योजनांची अंमलबजावणी करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या आंदोलनात रत्नागिरी जिल्हा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. दरम्यान, या आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.