
लोकशासन-प्रतिनिधी: बारामती ग्रामीण
बारामती : बारामती येथे झालेल्या लोकअदालतमध्ये विविध विमा कंपन्यांकडून अर्जदारांना एकूण एक कोटी शहात्तर हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आल्याची माहिती अॕड.विशाल बर्गे यांनी दिली.
या लोकअदालतमध्ये एचडीएफसी विमा कंपनीतर्फे मोटार वाहन अपघाताशी संबंधित दोन प्रकरणांत एकूण ५८ लाख ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई अर्जदारांना देण्यात आली. यातील पहिल्या प्रकरणात अर्जदार सुमित्रा जाधव यांना पतीच्या अपघाती मृत्यूबाबत दाखल प्रकरणात तडजोडी अंतर्गत २७ लाख ५० हजार रुपयांची भरपाई मंजूर झाली.तर दुसऱ्या प्रकरणात अर्जदार ज्योती ताठे यांना ३१ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली.
अॕड.विशाल बर्गे म्हणाले की, न्यायालयीन खटल्यांचा अंतिम निकाल लागेपर्यंत अनेकदा बराच कालावधी लागतो. त्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम पीडित अर्जदारांना उशिरा मिळते आणि त्या वेळी त्या पैशांचा अपेक्षित लाभ होत नाही.मात्र, एचडीएफसी विमा कंपनीचे व्यवस्थापक मंगेश इनामदार यांनी या प्रकरणांमध्ये तात्काळ निर्णय घेत अर्जदारांना त्वरित व जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्याची तयारी दर्शविली.
या प्रकरणात अर्जदारांचे वकील प्रमोद देशमुख यांच्यासह पॅनल न्यायाधीश व्ही.सी.बर्डे (प्रमुख न्यायाधीश) आणि सुरेखा आर.पाटील (पहिले तदर्थ न्यायाधीश) यांनी दिलेल्या नुकसानभरपाईबाबत समाधान व्यक्त केले.