
लोकशासन– प्रतिनिधी:शिवाजी पवार,इंदापुर
इंदापुर- विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे यशस्वी समूह, पुणे व आयबीएम या नामांकित कंपनीच्या संयुक्त विद्यमाने “कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आधारित कौशल्य विकास कार्यक्रम” डिप्लोमा अभियंता विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला. सदर उपक्रमात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांना उद्योग जगतातील स्पर्धेसाठी सक्षम बनवण्याचा उद्देश होता.
कार्यक्रमात यशस्वी समूहाचे मुख्य प्रशिक्षण अधिकारी राजेश नागरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत जनसंपर्क अधिकारी योगेश रांगणेकर हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे होते.
राजेश नागरे यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानात विद्यार्थ्यांना सांगितले की, “जेव्हा तुम्ही डिप्लोमा मध्ये प्रवेश घेता तेव्हा अभ्यासक्रम ३-४ वर्षांपूर्वीचा असतो. त्यामुळे तुम्ही शिकणाऱ्या गोष्टी हे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जुन्या असतात. आजचा उद्योग जगतातील बाजार झपाट्याने बदलतो आहे. अशा वेळी जर तुमच्याकडे अद्ययावत कौशल्ये नसेल, तर तुम्ही स्पर्धेत मागे पडू शकता.”
त्यांनी यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कौशल्य वाढीच्या संधींचा उल्लेख केला. त्यांनी स्पष्ट केले की, AI चा वापर करून विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकता येतात, स्वत:चे कौशल्य वाढवता येते आणि ऑनलाईन कोर्सेस, मॉक इंटरव्ह्यू टूल्स यांचा विनामूल्य लाभ घेता येतो. हे सर्व आधुनिक साधने विद्यार्थ्यांसाठी सहज उपलब्ध असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी बोलताना श्री. नागरे यांनी भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचा उल्लेख करत सांगितले की, “देशात नवनवीन उत्पादने तयार करण्यास प्रोत्साहन दिले जात असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी याचा विचार करून योग्य कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.”
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मॉक इंटरव्ह्यू साठी वापरता येणाऱ्या विविध AI टूल्सची माहिती देखील देण्यात आली. या टूल्स चा वापर करून विद्यार्थी स्वत:ची तयारी करून, त्यांच्या कमतरता ओळखून सुधारणा करू शकतात.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात टिकून राहण्यासाठी नवनवीन कौशल्ये शिकणे अत्यंत आवश्यक आहे. महाविद्यालयातील प्रशिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर आहे.”
कार्यक्रमाचे आयोजन ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर योगेश जाधव यांनी केले होते, तर सूत्रसंचालन प्रा.सोनाली काळे यांनी प्रभावीपणे पार पाडले.सदर कार्यक्रमास सुमारे २५० विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या वेळी उपस्थित पाहुण्यांनी विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक मध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक व प्रयोगशाळेतील सुविधा, आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर, आणि झाडांची निगा राखण्याची पद्धत याबाबत विशेष समाधान व्यक्त केले. त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि पर्यावरण पूरक वातावरणाचे मन:पूर्वक कौतुक केले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व दिशा दर्शक ठरला असून, अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने राबवावे, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.