
लोकशासन-प्रतिनिधी: कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गाव आणि शिरोळ तालुका सध्या एका अनोख्या घटनेमुळे चर्चेत आहे. गावातील जैन मठात गेल्या ३५ वर्षांपासून पूजली जाणारी ‘महादेवी उर्फ माधुरी’ ही हत्तीण रिलायन्स समूहाशी संबंधित वनतारा रेस्क्यू सेंटर (गुजरात) येथे हलवण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रिलायन्स जिओ कंपनीवर बहिष्कार टाकला असून, अवघ्या १८ तासांत ७,००० हून अधिक जिओ ग्राहकांनी आपली सिमकार्ड्स इतर टेलिकॉम कंपन्यांकडे (प्रामुख्याने एअरटेल) पोर्ट केली आहेत. ही मोहीम केवळ नांदणीपुरती मर्यादित नसून, शिरोळ तालुका, कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकातील काही गावांपर्यंत पसरली आहे.
नांदणी गावातील जैन मठात ‘महादेवी’ ही हत्तीण गेल्या ३५ वर्षांपासून धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेचे प्रतीक होती. स्थानिक ग्रामस्थ तिची पूजा करत असत आणि ती त्यांच्या आस्थेचा भाग बनली होती. मात्र, अलीकडेच ही हत्तीण रिलायन्सच्या वनतारा रेस्क्यू सेंटरला हलवण्यात आली. ग्रामस्थांचा आरोप आहे की, हत्तीण निरोगी आणि सक्षम असताना तिला जबरदस्तीने हलवण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. यामुळे गावकऱ्यांनी रिलायन्स समूहाविरोधात आंदोलन सुरू केले आणि जिओवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून या मोहिमेला स्थानिक पातळीवर प्रचंड प्रतिसाद मिळत असून, एअरटेल आणि इतर टेलिकॉम कंपन्यांनी गावात सिम पोर्टिंगसाठी विशेष स्टॉल्स लावले आहेत. ग्रामस्थ मोठ्या संख्येने यात सहभागी होत असून, ही मोहीम सामाजिक माध्यमांवरही ट्रेंड करत आहे.
नांदणी आणि शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांनी स्वतःहून ही मोहीम सुरू असुन यात सर्व वयोगटातील लोक, विशेषतः तरुण आणि जैन समुदाय, सक्रिय सहभागी आहेत.माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सांगली आणि कर्नाटकातील गावांमध्येही ही मोहीम पसरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
रिलायन्स समूहाने गुजरातमधील जामनगर येथे वनतारा रेस्क्यू सेंटर स्थापन केले आहे, जे प्राण्यांच्या संरक्षण आणि पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. रिलायन्सच्या म्हणण्यानुसार, महादेवी हत्तीणला तिच्या आरोग्यासाठी आणि उत्तम देखभालीसाठी तिथे हलवण्यात आले. मात्र, ग्रामस्थांचा दावा आहे की, हत्तीण निरोगी होती आणि स्थानिक मठात तिची योग्य काळजी घेतली जात होती. त्यामुळे हा निर्णय त्यांना मान्य नाही.सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गावांमध्येही जिओविरोधी भावना पसरत आहे. काही ठिकाणी रिलायन्सच्या इतर उत्पादनांवरही बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.तर कर्नाटकातील सुमारे ७४३ गावांमध्ये रिलायन्सच्या सर्व उत्पादनांना ‘नो एंट्री’चा फतवाच काढण्यात आला आहे.