
लोकशासन-प्रतिनिधी:बाळासाहेब कवळे,वालचंनगर
कळंब : (ता.इंदापूर) येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.राजकुमार शेलार यांच्या ‘दलित आत्मकथने व भगवान इंगळे यांचे ढोर आत्मकथन’ या ग्रंथास मातंग साहित्य परिषद, पुणे यांचा ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय वाड्.मय पुरस्कार ‘२०२५ लाभल्याबद्दल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन हा पुरस्कार देण्यात आला.
सत्कार समारंभाला उत्तर देताना डॉ. शेलार म्हणाले की, माझा हा पहिल्याच ग्रंथ मी भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केला आहे. मानवतावादी विचाराने प्रेरित असलेल्या राष्ट्र सेवा दल व इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीकडून झालेला हा जाहीर सत्कार माझ्यासाठी खूप मोलाचा आहे.
राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी व इंदापूर शहर नागरी समितीचे प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रा.कृष्णाजी ताटे यांचा मी ऋणी आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार जगण्याला बळ देणारा आहे.पुढील लिखाण्यासाठी मला प्रेरणा देणारा आहे असे शेलार यांनी सांगितले.
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान अध्यक्ष आनंदी रणसिंग ,उपाध्यक्ष प्रकाश कदम ,सचिव विरसिंह रणसिंग,विश्वासराव रणसिंग महाविद्यालय प्राचार्य डॉ. अशोक काळंगे ,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी व राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी राष्ट्रीय पुरस्कार भेटल्यामुळे व जाहीर नागरी सत्काराने सन्मानित झाल्यामुळे डॉ.राजकुमार शेलार यांचे अभिनंदन केले आहे.