हंगाम संपला! साखर कारखान्यांचे धुराडे थांबले; ऊसतोड मजूर परतीच्या वाटेवर

Spread the love

लोकशासन-गणेश गुप्ते, उपसंपादक

भवानीनगर:(१३) पुणे जिल्हातील ऊस गाळप हंगाम अखेर पार पडला असून बहुतांश साखर कारखान्यांनी आपला हंगाम औपचारिकरीत्या बंद केला आहे. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली ऊसतोड व गाळपाची लगबग आता थांबली आहे. कारखाने बंद होताच ऊसतोड कामगारांनी आपल्या गावी परतीचा मार्ग धरला आहे.

यंदाच्या हंगामात कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करण्यात आला. शेतकऱ्यांनी वेळेत ऊस पुरवठा केल्यामुळे गाळप प्रक्रियेला वेग आला होता. मात्र हंगाम संपताच कारखान्यांभोवतीची वर्दळ कमी झाली असून परिसरात शांतता पसरली आहे.


ऊसतोड कामगारांच्या कोप्या (झोपड्या) ओस पडू लागल्या आहेत. बैलगाडी, ट्रॅक्टर आणि ट्रकच्या माध्यमातून मजूर आपल्या कुटुंबासह, जनावरांसह मूळ गावी निघाल्याचे चित्र महामार्गावर पाहायला मिळत आहे. विशेषतः बीड, जालना, धाराशिव आणि जळगाव यांसारख्या भागांतील मजूर आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत.
ऊसतोड कामगारांसाठी हा परतीचा काळ भावनिक मानला जातो. अनेक महिने कुटुंबापासून दूर राहून काम केलेले कामगार आता आपल्या गावात परतत आहेत. गावाकडे जाण्यापूर्वी ऊसतोड मजुरांनी कारखाना परिसरात सहकाऱ्यांशी निरोप घेतल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, हंगाम संपल्यानंतर कारखान्यांमध्ये देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पुढील हंगामासाठी नियोजन व तयारीला देखील लवकरच प्रारंभ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button