इंदापूर तहसीलदारांच्या कारभारावर भाजपाचे गंभीर आरोप !

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण

इंदापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने इंदापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा महामंत्री डॉ. आकाश कांबळे यांनी इंदापूर तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात’ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो कार्यक्रमस्थळी जाणीवपूर्वक लावण्यात आला नसल्याचा आरोप केला. हा प्रकार अत्यंत खेदजनक असून संविधान निर्मात्यांचा सन्मान राखणे ही प्रत्येक शासकीय यंत्रणेची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.काही अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या चौकटी बाहेर जाऊन राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांप्रमाणे भूमिका घेतल्याचेही त्यांनी म्हटले.

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित रस्त्यांच्या प्रकरणांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे इंदापूर तालुक्यात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या अर्जांवर वेळेत निर्णय घेतला जात नसून स्थळ पाहणीसाठीही अधिकारी टाळाटाळ करतात. संबंधित मालकांचा फोन आल्याशिवाय अथवा “टेबलावर वजन” ठेवल्याशिवाय कोणतीही कामे मार्गी लागत नसल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले.तहसील कार्यालयातील कारभारामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असून महसूल विभागातील अनेक विषय हेतुपुरस्सर प्रलंबित ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उजनी धरण परिसरातील वाळू उपसा, जमिनींचे वाद, रस्त्यांची प्रकरणे तसेच महसूल विभागातील विविध कामांमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप करत, तहसीलदारांच्या संगनमताशिवाय अशा प्रकारचे व्यवहार शक्य नसल्याचा दावा त्यांनी केला. टेबलावर पैसे ठेवल्याशिवाय कोणतेही काम होत नसल्याची भावना तालुक्यातील नागरिकांमध्ये असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या सर्व प्रकरणांबाबत आपण माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत माहिती मागविली असून, नियमानुसार माहिती न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध पुढील कायदेशीर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे इंदापूरच्या तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रशासन पारदर्शकपणे काम करत असताना इंदापूरमध्ये तहसीलदार मनमानी कारभार करत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा झाला नाही आणि महसूल प्रशासनाच्या कारभारात सुधारणा झाली नाही, तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने इंदापूर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही पत्रकार परिषदेत देण्यात आला.

यावेळी तहसीलदार जीवन बनसुडे यांच्या कार्यपद्धतीमुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच नागरिकांना दमदाटी करण्यामागे नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.पत्रकार परिषदेस भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा महामंत्री डॉ. आकाश कांबळे, मंडलाध्यक्ष राजकुमार जठार, राम आसबे, किरण गानबोटे, प्रविणकुमार शहा, मयुर शिंदे, लखन जगताप, राज राऊत, सागर आसबे तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button