
लोकशासन-गणेश गुप्ते , प्रतिनिधी
भवानीनगर:(२३) भिगवण (ता. इंदापूर) येथील अपहरण प्रकरण आणि बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचे तीव्र पडसाद इंदापूर तालुक्यात उमटत आहेत. या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि ‘लव्ह जिहाद’ विरोधी कडक कायदा करण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने उद्या, मंगळवार दि. २४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सणसर आणि भवानीनगरची व्यापार पेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाला निवेदन सादर.
या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे इंदापूर तालुका अध्यक्ष बजरंग रायते आणि सहमंत्री महेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले.
प्रमुख मागण्या आणि भूमिका:
लव्ह जिहाद कायदा: राज्यात लव्ह जिहाद विरोधी कडक कायदा तात्काळ लागू करण्यात यावा.
महिला सुरक्षा: चिखली आणि भिगवण येथील प्रकरणातील गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.
व्यापार पेठ बंद: निषेधाचे प्रतीक म्हणून उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत स्थानिक व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या आंदोलनास पाठिंबा द्यावा.
या निवेदनावर विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सह्या असून, शांततामय मार्गाने हा निषेध नोंदवला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानेही खबरदारीचे उपाय योजले असून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.