कर्तव्यनिष्ठ शिक्षकांमुळेच संस्थेचा नावलौकिक; संस्था हित जपणाऱ्यांच्या पाठीशी संस्था नेहमीच उभी : सचिव विरसिंह रणसिंग

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-वालचंदनगर

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करण्याच्या उद्देशाने उभी राहिलेल्या इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर ता.इंदापूर संस्थेने गेल्या चार दशकांत शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले असून, संस्थेच्या प्रगतीमध्ये प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि संस्था हित जपणाऱ्या शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.अशा शिक्षकांच्या पाठीशी संस्था कायम ठामपणे उभी राहील,असे प्रतिपादन संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी कळंब ता.इंदापूर येथे मुख्याध्यापक सेवापुर्ती समारंभात केले.

माध्यमिक विद्यालय तावशी येथील मुख्याध्यापक महादेव भगवान बागल व माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी येथील मुख्याध्यापक प्रमोद एकनाथ भोंग यांच्या सेवापूर्ती समारंभ विश्वासराव रणसिंग महाविद्यालय सेमीनार हॉल मध्ये संपन्न झाला.यावेळी विश्वासराव रणसिंग महाविद्यालय प्राचार्य डॉ.अशोक काळंगे,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग ,मुख्याध्यापक बाळू कदम इ मान्यवर तसेच भोंग, बागल यांचे कुटुंबिय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सचिव विरसिंह रणसिंग यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेताना सांगितले की,संस्थेची स्थापना १९७९ मध्ये करण्यात आली.ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या ध्येयातून महाविद्यालयाची स्थापना १९८४ मध्ये झाली.सन १९९३ मध्ये दोन माध्यमिक विद्यालयांची सुरुवात करण्यात आली. विशेषतः मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विश्वासराव रणसिंग दादांनी घेतलेला पुढाकार आजही संस्थेच्या कार्याचा प्रेरणादायी आधार आहे.ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत संस्थेने विश्वासार्ह शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक मिळविला आहे. या यशामागे शिक्षकांचे समर्पण, शिस्त, विद्यार्थीकेंद्रित कार्यपद्धती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा सातत्याने घेतलेला ध्यास असल्याचे सचिवांनी नमूद केले.

सेवानिवृत्त होत असलेल्या दोन्ही मुख्याध्यापकांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य उल्लेखनीय असून, त्यांची निष्ठा आणि कार्यसंस्कृती नव्या पिढीतील शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही सचिवांनी व्यक्त केला. त्यांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि यशस्वी शैक्षणिक सेवेला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button