
लोकशासन- इंदापुर
इंदापूर तालुक्यात स्टॅम्प विक्रीमध्ये गंभीर गैरप्रकारांचे प्रकार समोर येत आहेत. १०० रुपयांचा स्टॅम्प १२० रुपयांना विकला जात असून, याबाबत तक्रारी दाखल झाल्या असतानाही दुय्यम निबंधक कार्यालय, इंदापूर यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या गैरप्रकारांमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक नुकसान होत आहे आणि प्रशासनावरील त्यांचा विश्वास कमी होत आहे.
इंदापूर तहसील कार्यालय परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कागदपत्रे, करार, किंवा इतर प्रशासकीय कामांसाठी स्टॅम्पची आवश्यकता भासते. परंतु, काही स्टॅम्प व्हेंडर्स स्टॅम्प शिल्लक असतानाही मुद्दामहून उपलब्ध नसल्याचे सांगतात. यामुळे नागरिकांना जादा किंमतीने स्टॅम्प खरेदी करावे लागतात. विशेषतः ग्रामीण भागातील अशिक्षित किंवा कमी माहिती असलेल्या लोकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
शासकीय नियमांनुसार, प्रत्येक स्टॅम्प व्हेंडरने दर्शनी भागात त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या स्टॅम्पच्या संख्येची आणि किंमतीची माहिती असलेला फलक लावणे बंधनकारक आहे. परंतु, इंदापूरमधील कोणताही व्हेंडर या नियमाचे पालन करताना दिसत नाही. यामुळे स्टॅम्प विक्रीत पारदर्शकता नसून, सर्वसामान्य जनतेची लूट होत आहे.
सुरज पिसे यांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले, “हा प्रकार सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा भंग आहे. स्टॅम्पसारख्या मूलभूत गरजेच्या गोष्टीतही लूट होत असेल, तर प्रशासनाची निष्क्रियता गंभीर आहे. आम्ही मागणी करतो की, स्टॅम्प व्हेंडर्सवर कठोर कारवाई करून पारदर्शक व्यवहार सुनिश्चित केले जावेत.”
युवा मोर्चा, इंदापूर तालुका सर्वसामान्य जनतेला आवाहन करते की, स्टॅम्पच्या किमतीबाबत जागरूक राहावे. १०० रुपयांचा स्टॅम्प १२० रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीला घेऊ नये. तसेच, स्टॅम्प व्हेंडर्सनी त्यांच्याकडे उपलब्ध स्टॅम्पची माहिती फलकावर लावावी आणि नियमांचे काटेकोर पालन करावे. याबाबत कोणताही गैरप्रकार आढळल्यास, नागरिकांनी तात्काळ तक्रार नोंदवावी आवाहन करण्यात आले आहे .
या समस्येच्या विरोधात जनजागृती व्हावी यासाठी युवा मोर्चा, इंदापूर तालुका सर्व वृत्तपत्रे, न्यूज पोर्टल्स, यूट्यूब चॅनेल्स, सोशल मीडिया मंच आणि इतर प्रसारमाध्यमांना आवाहन करते की, हा विषय जनतेपर्यंत पोहोचवावा. तसेच, प्रशासनाने तात्काळ कारवाई करून स्टॅम्प विक्रीतील गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.