
लोकशासन-प्रतिनिधी:नाझिया सय्यद,उद्धट
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज नागपंचमी सण उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शाळा परिसर आनंद व उत्सवाच्या वातावरणाने भरून गेला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींनी पारंपरिक रांगोळीसोबत आकर्षक मेंदी काढल्या. या उपक्रमाने सौंदर्य आणि संस्कृती यांचे उत्तम मिश्रण घडवले. त्यानंतर मुलांनी पतंग उडवत आकाशात रंगांची उधळण केली. शाळेच्या आवारात कृत्रिम वारूळाची पूजा करण्यात आली. वारुळ पूजन करून निसर्गपूजेचा संदेश देण्यात आला.विशेष आकर्षण म्हणजे स्थानिक महिलांनी पारंपरिक नागपंचमी गाण्यांवर फेर धरत उत्सवाचा रंगतदार समारंभ साजरा केला. कार्यक्रमादरम्यान धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची एकत्रित अनुभूती सर्वांना मिळाली.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेचे मुख्याध्यापक गणेश धायगुडे, शिक्षक राजाराम शिंदे, गणेश शिंदे, श्वेता धायगुडे, निलावती भोसले, अंगणवाडी सेविका विजया निंबाळकर आणि लता मुळीक यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले.गणेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट समन्वयक म्हणून भूमिका बजावत उपक्रमाची संपूर्ण रचना अत्यंत कल्पकतेने सादर केली.
कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियंका पारधे, निर्माण संस्थेच्या सहकारी सारिका धोत्रे, मुलांचे पालक, तसेच माता-भगिनींनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कार्यक्रमानंतर परिसरात व उपस्थित महिलांमध्ये “शाळेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि संस्मरणीय झाला,” अशी चर्चा ऐकू येत होती. शाळेमध्ये नियमितपणे अशा सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याचेही यावेळी बोलताना उपस्थितांनी नमूद केले.या संपूर्ण सोहळ्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले असून, विद्यार्थ्यांचा सहभाग, पारंपरिक सजावट व आनंददायी वातावरण याची झलक त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते.