
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,पुणे ग्रामीण
दौंड : महाराष्ट्र विधानमंडळ सार्वजनिक उपक्रम समिती प्रमुख आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या सदस्यांचा दौरा दौंड तालुका (जि. पुणे) येथे नियोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यामध्ये समिती सदस्य कुरकुंभ एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र तसेच दौंड शहरा नजीक असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या निवासस्थान प्रकल्पाची पाहणी करणार असून संबंधित अधिकाऱ्यांशी व स्थानिक घटकांशी विशेष चर्चा होणार आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राच्या भेटीदरम्यान समितीकडून स्थानिक उद्योजक व उद्योगसंघटनांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये औद्योगिक गुंतवणुकीला चालना, रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधा तसेच उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी यावर चर्चा होईल.तसेच, राज्य राखीव पोलीस दलाच्या निवास प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान निवासविषयक सुविधांचे निकष, दर्जा व सोयी-सुविधा यांचा आढावा घेण्यात येईल. यामध्ये पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या राहणीमानाबरोबरच सुरक्षा व कल्याणाशी संबंधित बाबींवरही समिती चर्चा करणार आहे.दौऱ्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग तसेच स्थानिक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.समितीच्या नियोजित दौऱ्यामध्ये आमदार श्री. राहुल दादा कुल यांच्यासह समितीतील आमदार सदस्य सहभागी होणार आहेत.