
लोकशासन-प्रतिनिधी: इंदापूर ग्रामीण
कृषी सेवा केंद्र चालकांच्या मनमानीला चाप
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील मे बाहुबली शांतीलाल दोभाडा या कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित करत कृषी विभागाने कारवाई केलेली असून निलंबनाचा आदेश परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिला आहे.
इंदापूर तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रां कडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट होत असुन खतांचा तसेच युरियाचा तुटवडा भासवुन चढ्या दराने विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे.तर अनेक कृषी चालकांची अरेरावी व मग्रुरी तसेच शासनाचे नियम धाब्यावर बसवून दुकानदारी चालवली जात असल्याचे दिसून येत आहे.तर अनेक कृषी केंद्रात परवानाधारक कृषी चालका ऐवजी इतर व्यक्तीच कृषी केंद्र चालवत असल्याचे दिसून येत आहे.

वालचंदनगर येथील मे बाहुबली शांतीलाल दोभाडा या दुकानाविरुद्ध शेतकऱ्यांकडून ज्यादा दराने खत विक्री करत असल्याबाबत तक्रार कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या.याची दखल घेत गुण नियंत्रण निरीक्षक इंदापूर योगेश फडतरे यांनी कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता खताची ज्यादा दराने विक्री,शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा, साठा फलक, भाव फलक न लावणे इत्यादी गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यानुसार कृषी विभागाने आदेश काढत या कृषी सेवा केंद्राचे दहा दिवसांसाठी निलंबन केले आहे.
इंदापूर तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी कायद्यातील नियमानुसार खते, बियाणे व कीटकनाशके यांची विक्री करावी. शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.