
लोकशासन-प्रतिनिधी:इंदापूर ग्रामीण
जंक्शन : गेले अनेक वर्ष पाठपुरावा करूनही ग्रामपंचायत मधील कामे मार्गी लागत नाहीत.आनंदनगर परिसरात रस्ते व गटारीचे अर्धवट काम केल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.पावसाच्या पाण्याचा तसेच सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने ते साचून मच्छर तयार होतात व यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. आनंदनगर परिसरात लोकवस्ती जास्त असलेल्या भागात मोबाईल टॉवर आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामसेवक कोणतेही ठोस पाऊल उचलत नाहीत.असा आरोप शशिकांत गेजगे यांच्या कडून करण्यात आला असून त्यांनी ग्रामसेवकाचा जाहीर सत्कार करणार असल्याचे गेजगे यांनी सांगीतले.
- यावेळी पुढे गेजगे यांनी सांगीतले गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घेण्याचा लेखी अधिकार दिला असूनही कोणतीही कारवाई ग्रामविकास अधिकारी राजेंद्र काळे यांच्या कडुन झालेली दिसत नाही. अशा अनेक कामामध्ये चालढकल पणा केल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी राजेंद्र काळे यांचा जाहीर सत्कार मंगळवार दिनांक ९ सप्टेंबरला गेजगे कडून करण्यात येणार आहे.
विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्राद्वारे गेजगे यांनी निमंत्रण पाठवून उपस्थित राहण्या संदर्भात विनंती केली आहे. आनंदनगर गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, सर्व राजकीय पक्षाचे नेते, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार बांधव यांच्या उपस्थिती मध्ये मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता, ग्रामपंचायत कार्यालय आनंदनगर ता. इंदापूर, जि. पुणे येथे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र काळे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे असे शशिकांत गेजगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.