
लोकशासन-प्रतिनिधी:संजय शिंदे,पुणे ग्रामीण
भिगवण : इंदापूर तालुक्यातील मौजे अकोले गावात ऊस टोळीच्या पैशावरून झालेल्या दबावामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, विशेष म्हणजे या प्रकरणातील एक आरोपी हा स्वतः महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेला जवान असल्याची माहिती समोर आली आहे.
या अमानुष प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.फिर्यादी विनोद नाथा कवटेकर (वय 33, रा. विठी, ता. पाटोदा, जि. बीड, सध्या गढी सहकारी साखर कारखाना, ता. गेवराई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील नाथा पांडुरंग कवटेकर (वय ५६) यांना आरोपी तुषार दराडे व बाळु खाडे (दोघे रा. अकोले, ता. इंदापुर) यांनी ऊस टोळी मिळण्यासाठी दिलेले १ लाख रुपये परत घेण्याच्या दबावाखाली बसवून ठेवले. त्यांच्याकडून ५७,000 रुपये फोन पे द्वारे वसूल करण्यात आले. उर्वरित रकमेवरून वारंवार ताण दिला गेला. नाथा कवटेकर यांना बी.पी. व शुगरचा त्रास असल्याचे आरोपींना माहिती होते. तरीदेखील त्यांनी पैशासाठी सतत मानसिक छळ केला. या तणावामुळे त्यांचा बी.पी. लो झाला व शुगर वाढून प्रकृती गंभीर झाली. प्रकृती बिघडत असतानाही त्यांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात न नेता आरोपींनी हलगर्जीपणा केला. अखेरीस या दुर्लक्षामुळेच त्यांचा मृत्यू झाला.
फिर्यादीच्या तक्रारीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, आरोपींच्या जबरदस्ती व हलगर्जीपणामुळेच वडिलांचा मृत्यू झाला आहे. पैशाच्या लालसेपोटी आजारी व्यक्तीचा जीव घेणे हे अमानुष व निर्दयी कृत्य असल्याचे तीव्र शब्दांत नमूद केले आहे.या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीं पैकी तुषार दराडे हा महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे. कायदा व सुव्यवस्थेची शपथ घेतलेला एक पोलिस कर्मचारीच जर अशा प्रकारात सामील असेल, तर ही घटना पोलीस दलाच्या प्रतिमेला काळी छाया टाकणारी ठरत आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.