
लोकशासन-प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातून असुरक्षित व बेदरकारपणे माती,मुरुम वाहतूक केली जात आहे मात्र याकडे महसूल विभागा कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.इंदापुर तालुक्याच्या पश्चिम भागात निरा नदि असुन नदिच्या एका बाजूला पुणे तर दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्हा आहे.दोन जिल्ह्याचा सिमा लागुन असल्याने बऱ्याच वेळा सोलापूर जिल्ह्यातुन माती व मुरुम आणला जातो.
पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सिमा लागुनच असल्याने पुणे जिल्ह्यात कारवाई होणार असल्याचे दिसून येताच हे माती चोर सोलापूर जिल्ह्याचा आश्रय घेतात तर सोलापूर जिल्ह्यात कारवाई होणार असल्याचे समजताच पुणे जिल्ह्यात हेच माती चोर येताना दिसतात.माती वाहतूक असुरक्षितपणे तर केली जातच आहे.मात्र हा माती उपसा बेकायदेशीरपणे केला जात असल्याची चर्चा असून माती उपसा करण्यासाठी महसूल विभागा कडे याची रक्कम (राॅयल्टी) अदा केली आहे का ? केली असल्यास जेवढी रक्कम भरली आहे तेवढाच माती उपसा केला जातो का ? उपसा केलेल्या मातीची मोजदाद कोणत्या मानांकाने केली जाते हे सगळेच गुलदस्त्यात आहे.
मातीची वाहतूक करताना शासकीय नियमाना मातीमोल ठरवत हे माती माफीया नियमबाह्य पद्धतीने व असुरक्षितरीत्या मातीची वाहतूक करताना दिसत आहेत.विशेष म्हणजे उजनी धरण क्षेत्रात वाळू माफियांवर वारंवार कारवाई करत स्फोटकांच्या सहाय्याने आपली टिमकी वाजवत बोटी नष्ट करणारा महसूल व गौण खनिज विभाग इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील माती , मुरुम वाहतूकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.