
लोकशासन- प्रतिनिधी:संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण
इंदापूर : (ता.१३) इंदापूर तालुक्यातील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भिगवण गावातील ग्रामस्थांना स्वखर्चातून विकासकामे करण्याची वेळ आली असून जावेद शेख यांनी स्वखर्चातून सुमारे तीस हजार रुपये खर्च करून स्थानिक रहिवाश्यांची सांडपाण्याची व्यवस्था करून दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,येथील वॉर्ड क्र ४ मधील खेळाच्या मैदानावर गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिक,शाळकरी विद्यार्थी,जाणारे येणारे प्रवासी, स्थानिक रहिवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.दूषित व दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे या परीसरात आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असल्याने स्थानिक प्रशासनाच्या निष्कियतेबद्दल नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत युवकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार सांगूनही त्याच्या कडून उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देण्यात आल्याने त्यांनी सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख यांचेशी संपर्क साधत सांडपाण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी केली यावर त्यांनीही तात्काळ प्रतिसाद देत त्याठिकाणी शोषखड्डा घेत त्यासाठी लागणारे विट व इतर साहित्य स्वखर्चातून खरेदी करून ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर केली. त्यामुळे तेथील युवक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय परदेशी यांचेशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
भिगवणचे सरपंच हे रिमोट कंट्रोल द्वारे चालत आहेत. ते स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत.या कामाबद्दल त्यांना संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडून गावचा विकास होणे शक्य नाही.
शुभम काकडे, ग्रामस्थ भिगवण
येथील सांडपाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसत होते.काही ग्रामपंचायत पदाधिकारी सूडबुद्धीने राजकारण करत असल्याने विकास कामात अडथळे येत आहे.ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्वखर्चातून शोषखड्डयाचे काम केले आहे.
जावेद शेख,सामाजिक कार्यकर्ते, भिगवण