
लोकशासन- प्रतिनिधी:संजय शिंदे,ग्रामीण इंदापूर
इंदापूर :(ता २२) नगरपरिषद निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार भरतशेठ शहा आणि सर्व नगरसेवक पदांचे उमेदवार यांच्या प्रचाराला आज मोठी गती मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आज इंदापूर शहरात भव्य जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर होताच संपूर्ण तालुक्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे.
शनिवारी दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दोन ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली आहे.सायं. ५ वा. – श्रीराम सोसायटी नजीक, महात्मा फुलेनगर, इंदापूर सायं. ७ वा. – दर्गा मस्जिद चौक, इंदापूर या सभांमध्ये मंत्री दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या “विकास पदोपदी, म्हणूनच राष्ट्रवादी” या घोषणेला अधोरेखित करत इंदापूर शहरातील विकासकामांची दिशा, भविष्यातील योजना आणि पक्षाच्या उमेदवारांबद्दल जनतेच्या अपेक्षा यावर थेट संवाद साधणार आहेत.भरतशेठ शहा यांना नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकडून मिळालेला विश्वास, त्यांचा अनुभव आणि इंदापूरच्या सर्वांगीण विकासावरील त्यांची दृष्टी – या सर्व मुद्द्यांना आजच्या सभेत विशेष महत्त्व मिळण्याची शक्यता आहे.
उमेदवारांची ओळख, त्यांचे काम, आगामी प्रकल्प, तसेच विद्यमान समस्यांवर उपाययोजना याबाबत मंत्री भरणे कोणती भूमिका मांडतात याची उत्सुकता मतदारांमध्ये जाणवत आहे. इंदापूर शहरात सध्या निवडणूक वातावरण चांगलेच तापले असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी चळवळ दिसून येत आहे.आज होणारी मामा भरणे यांची सभा ही निवडणूक प्रचारातील महत्त्वाचा टप्पा मानली जात असून या सभेद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आणि उमेदवारांच्या बाजूने निर्माण झालेली सकारात्मक हवा अधिक दृढ होईल, अशी पक्ष कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.