
लोकशासन – प्रतिनिधी:गणेश गुप्ते,भवानीनगर
भवानीनगर : (ता.२१) इंदापूर तालुक्यातील सणसर येथे अस्मिता महिला प्रभागसंघाचे व्हिजन ३ चे चार दिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले.नागपूर येथिल हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र शासनाने उमेद अभियानात काम करणाऱ्या समूह संसाधन व्यक्तींना ग्रामसखी हे पद निर्माण करून अधिकृत दर्जा दिला आहे.त्याच धर्तीवर हे प्रशिक्षण उमेद या शासकीय संस्थाचे बाळकटीकरण करणेसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पुणे च्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचेतर्फे देण्यात आले.
पुणे विभागातील आदर्श महिला प्रभागसंघाचे दूरदृष्टी, वार्षिक कृती आराखडा व व्यवसाय विकास आराखडा तयार करण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केले होते. यासाठी सणसर जिल्हा परिषद गटातील २० गावातील २२ महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.
यावेळी सणसर ग्रामपंचायत चे सरपंच यशवंत नरुटे यांनी अस्मिता महिला प्रभाग संघाचे प्रशासकीय कामकाज करणेसाठी त्यांना कार्यालय देण्याचे आश्वासन दिले.प्रभाग संघाचे प्रभाग समन्वयक डी.जे.राऊत, प्रशिक्षक सांगोला पंचायत समितीचे तालुका व्यवस्थापक सुधीर पिसे, प्रभागसंघ व्यवस्थापक कविता केकाण, अध्यक्ष कोमल मोरे, कोशाध्यक्ष वर्षा मोरे, सचिव कांचन निंबाळकर,ग्रामसखी प्रेरिका, बँक लिंकेज, लिपिका व पदाधिकारी उपस्थित होते.