एस.टी. प्रवाशांवर ‘NCMC’ स्मार्ट कार्ड सक्तीचा निर्णय; नागरिकांत संतापाची लाट..

Spread the love

लोकशासन -गणेश गुप्ते, उपसंपादक
भवानीनगर:(१३) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी.) प्रवाशांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर करताच नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. डिजिटल व्यवहाराच्या नावाखाली रोख व्यवहार हद्दपार करण्याचा हा निर्णय सामान्य प्रवाशांच्या माथी मारला जात असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.

“सोयीपेक्षा त्रास जास्त” अशी प्रवाशांची नाराजी रोख व्यवहार बंद करण्याच्या हालचालीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून येत आहे.

महामंडळाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील, ज्येष्ठ नागरिक, महिला व रोजंदारी करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा, रिचार्ज व्यवस्था किंवा तांत्रिक साधने अपुरी असताना हा सक्तीचा निर्णय कितपत व्यवहार्य ठरणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

नवीन कार्डासाठी शुल्क, रिचार्जची गरज आणि तांत्रिक अडथळे यामुळे प्रवाशांच्या खिशाला अतिरिक्त आर्थिक फटका बसणार आहे. “आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना हा नवा बोजा का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. काही प्रवाशांनी तर या निर्णयाला “सोयीच्या नावाखाली लादलेला त्रास” असे संबोधले आहे.
विशेष म्हणजे, अनेक एस.टी. स्थानकांवर अद्याप मूलभूत सुविधा अपुऱ्या असताना डिजिटल युगाच्या घोषणा केवळ कागदावरच मर्यादित असल्याची टीका होत आहे. बस उशिरा येणे, तिकीट व्यवस्थेतील गोंधळ, स्वच्छतेचा अभाव अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करून स्मार्ट कार्डची सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.

महामंडळाने हा निर्णय घेताना प्रत्यक्ष परिस्थिती, ग्रामीण भागातील अडचणी आणि सर्वसामान्यांची कोंडी यांचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा, प्रवाशांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, या सक्तीच्या निर्णयामुळे भविष्यात प्रवाशांना कितपत दिलासा मिळणार, की उलट अधिक गैरसोयी निर्माण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांना सोयी-सुविधा देण्याऐवजी सक्तीचे प्रयोग थांबवावेत, अशी मागणी आता तीव्र होत आहे.


“ग्रामीण भागातील प्रवाशांच्या वास्तवाशी विसंगत असा हा निर्णय आहे. अनेक गावांमध्ये अजूनही इंटरनेट सुविधा ढासळलेल्या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत स्मार्ट कार्ड सक्ती करणे म्हणजे सामान्य नागरिकांची थट्टा आहे. डिजिटल व्यवहाराच्या नावाखाली रोख व्यवहार हद्दपार करण्याचा हा प्रकार जनतेच्या मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष करणारा आहे.”
-विजय शिरसट शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गट उपतालुका प्रमुख
, इंदापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button