
लोकशासन-गणेश गुप्ते,प्रतिनिधी
इंदापूर:(०१) राज्य सरकारने एसटी बस प्रवाशांसाठी घेतलेला NCMC कार्ड सक्तीचा निर्णय अखेर मागे घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतींसाठी NCMC कार्ड बंधनकारक करण्याची घोषणा करण्यात आली होती.
मात्र जनतेच्या तीव्र संतापानंतर शासनाला युटर्न घ्यावा लागला.
ग्रामीण भागातील प्रवाशांनी कार्डाच्या किंमती, रिचार्जची अडचण आणि तांत्रिक समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. “सवलत देतो म्हणता आणि त्यासाठी आधी कार्ड घ्या, रिचार्ज करा, रांगेत उभे रहा – ही कसली सोय?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाने स्पष्ट केले की, सध्या NCMC कार्ड अनिवार्य नाही. प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच सवलतींचा लाभ मिळणार आहे. आगारांमध्ये कार्ड नोंदणी सुरू असली तरी सक्ती करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
नागरिकांच्या दबावामुळे शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा लागल्याची चर्चा सुरू आहे. वारंवार निर्णय जाहीर करून नंतर बदल करण्याच्या पद्धतीवरही टीका होत आहे.
एकंदरीत, NCMC कार्ड सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने प्रवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी शासनाच्या धोरणात्मक गोंधळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.