
लोकशासन-प्रतिनिधी: गणेश गुप्ते,भवानीनगर
शासकीय कार्यालयात कामावर असताना त्यांच्या दर्शनी भागावर ओळखपत्र लावणे राज्य शासनाने बंधनकारक केले आहे.मात्र त्याची अंमलबजावणी इंदापूर तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात झाली नसून याबाबत अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये अनास्था दिसून येत आहे.
सामान्य प्रशासन विभागाने सन २०१४ रोजी ओळखपत्र वापरण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही .
त्यामुळे सरकारने पुन्हा सन २०२० व २०२३ मध्ये ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक केले होते.असे असतानाही त्याचीही अंमलबजावणी इंदापूर तालुक्यात बहुतेक कार्यालयात होताना दिसत नाही. नागरिक विविध कामकाजासाठी कार्यालयामध्ये येत असतात त्यावेळी अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे नाव व पदनाम माहिती होणे अथवा ओळख पटणे आवश्यक आहे.
मात्र हजर असलेले बहुतेक अधिकारी, कर्मचारी ओळखपत्र लावत नाहीत. नागरिकांनी ओळखपत्राची मागणी केली असता त्यांनी ते दाखवणे अपेक्षित आहे. कार्यालयात प्रवेश करतेवेळी ओळखपत्राचे काटेकोरपणे तपासणी करून ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्यांची नावे कारवाईसाठी संबंधित प्रशासकीय विभागाकडे अशा सूचनाही कार्यालय प्रमुखांना दिलेल्या आहेत.काही कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र आहे असे सांगतात मात्र ते टेबलमध्ये ठेवल्याचे आढळले.
इंदापूर तालुक्यातील काही कार्यालयाचा अपवाद वगळता इतर कार्यालयात सीसीटीव्ही आढळले नाहीत. जिथे नागरिकांची वर्दळ असते अशा कार्यालयामध्ये सुद्धा सीसीटीव्ही नाहीत.वर्ग चार मधील कर्मचारी व वाहनचालकांना गणवेश घालण्याचे बंधनकारक असतानाही बहुतेक शिपाई व वाहनचालकांच्या अंगावरील गणवेश गायब झाल्याचे चित्र आहे.बहुतेक कार्यालयातील शासकीय दूरध्वनी सेवा बंद आहेत.
कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे , कर्तव्य सूची, विविध समित्या, योजनांचा तपशील, नागरिकाची सनद,जन माहिती अधिकाऱ्यांची नावे, जेवणाची वेळ आधी माहिती दर्शवणारे फलक मोजक्याच कार्यालयात आहेत.