
लोकशासन – प्रतिनिधी:पुणे ग्रामीण
पुणे : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, पुणे यांच्या नव्या प्रशासकीय इमारतीत निकाल देण्यात आलेल्या एका प्रकरणात तक्रारदार कांताराम काळे यांना दिलासा मिळाला आहे. बोगस पपईची रोपे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी गणेश हायटेक नर्सरी, विकास वाडेकर (मुक्काम पोस्ट व तालुका खेड, जिल्हा पुणे) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदार कांताराम काळे यांनी गणेश हायटेक नर्सरीकडून पपईची रोपे खरेदी केली होती. मात्र, ही रोपे निकृष्ट व बोगस असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित नर्सरीकडे वारंवार पाठपुरावा केला. तरीही समाधानकारक तोडगा न निघाल्याने त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, पुणे येथे तक्रार दाखल केली.प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर आयोगाने नर्सरीकडून तक्रारदाराची फसवणूक झाल्याचे मान्य केले.
तक्रारदारास झालेल्या आर्थिक व मानसिक त्रासासाठी २५,००० रुपये नुकसानभरपाई तसेच तक्रारीच्या खर्चासाठी १५,००० रुपये, असे एकूण ४०,००० रुपये देण्याचे आदेश देण्यात आले. ही रक्कम आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत अदा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.या प्रकरणात तक्रारदार कांताराम काळे यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत, आंबेगाव तालुकाध्यक्ष देविदास काळे यांचे मार्गदर्शन लाभले.