दुचाकी व जबरी चोरी करणारी अंतरजिल्हा टोळी वालचंदनगर पोलीसान कडून जेरबंद

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी : वालचंदनगर

वालचंदनगर : पुणे जिल्हामध्ये गेले काही दिवसांपासुन दुचाकी वाहने, घरफोडी, जबरी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याअनुषंगाने संदीपसिंह गिल्ल पोलीस अधीक्षक, तसेच गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, व डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग यांनी वेळावेळी सर्व प्रकारच्या चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात तसेच दाखल चोरीचे गुन्हे कसे उघडकीस आणता येतील याबाबत वेळोवेळी आढावा बैठकीमध्ये व व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सुचना देवुन मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशन मधील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकामधील अंमलदार यांना वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांची माहिती देवुन त्याप्रमाणे गोपनीय बातमीदार सर्तक करुन व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करणेबाबत आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार हे मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांच्या अनुषंगाने तपास करत असताना तपास पथकामधील अंमलदार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की, मोटार सायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळीमधील महेश ऊर्फ मावडया मंगेश काळे व त्याचा साथिदार पंकज गुरूपत पवार यांनी गेले काही दिवसांपासुन त्यांच्या इतर साथिदारांसह वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येवुन मोटार सायकल चोरी केल्या बाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर इसमांबाबत गोपनीय माहिती घेतली असता महेश ऊर्फ मावडया मंगेश काळे व पंकज गुरूपत पवार रा. वांगी, ता. करमाळा, जि. सोलापुर हा इंदापुर बारामती रोडवरुन बारामतीच्या दिशेने येत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी तपास पथकामधील अंमलदार यांनी जावुन मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपीचा शोध घेत असताना सदर दोन्ही आरोपी हे गोतंडी, ता. इंदापुर गावचे हद्दीमध्ये मिळुन आले. त्यानंतर सदर आरोपीना ताब्यात घेवुन वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचे संपुर्ण नाव पत्ता विचारता त्यांनी आपले नाव १) महेश ऊर्फे मावडया मंगेश काळे, वय २४ वर्षे, रा. बाभुळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर, २) पंकज गुरूपत पवार, वय २४ वर्षे, रा. वांगी, ता. करमाळा, जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर आरोपींकडे मोटार सायकल चोरीच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्यांनी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीमधील वालचंदनगर पोलीस स्टेशन, जेजुरी पोलीस स्टेशन, दौंड पोलीस स्टेशन तसेच सोलापुर ग्रामीण हद्दीमधील करमाळा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेले काही दिवसांपासुन वेळोवेळी मोटार सायकल, घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यावेळी सदर पोलीस स्टेशन कडील अभिलेखाची पाहणी केली असता खालील प्रमाणे ०६ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

दोन्ही आरोपीना अटक करुन सखोल तपास करत दाखल गुन्हामधील ०५ मोटार सायकल असा एकुण ३,०८,०००/- रुपये किंमतीचा तसेच जबरी चोरी मधील ०३ ग्रॅम सोन्याचे दागिने एकुण किंमती ४८०००/- रुपये किंमतीचा असा चोरी गेलेला ३,५६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर दोन्ही आरोपी हे न्यायालयाच्या आदेशाने न्यायालयीन कोठडी मध्ये असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.

सदरची कामगिरी ही संदीपसिंह गिल्ल साो पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, गणेश बिरादार अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, डॉ. सुर्दशन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग व प्रमोद क्षिरसागर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सपोनि राजकुमार डूणगे, स्थानिक पुन्हे शाखेचे सपोनि कुलदीप संकपाळ, पोउपनिरी विजय टेळकीकर, श्रेपासई बाळासाहेब कारंडे,सपोफीरणजीत देवकर यांनी केली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button