खडकवासला कालव्याचे उन्हाळी आवर्तन तात्काळ सुरू करण्याची मागणी प्रदीप गारटकर व प्रविण माने यांनी केली.

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण

इंदापूर : इंदापूर तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाणीटंचाईच्या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी, ग्रामीण नागरिक आणि पशुपालक मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यासाठी उन्हाळी आवर्तन तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ पृथ्वीराज फाळके व कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, सिंचन भवन पुणे, श्र किरण देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

इंदापूर तालुक्यातील बहुतांश शेती ही खडकवासला कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी झाल्याने ऊस, डाळिंब, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांवर मोठे संकट ओढवले आहे.अनेक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिकांची लागवड केली असली तरी पाण्याअभावी ही पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत.परिणामी शेतकऱ्यांवर मोठ्या आर्थिक नुकसानीची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

याशिवाय तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अनेक विहिरी, कूपनलिका आणि बोअरवेल कोरड्या पडल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.पशुधनासाठीही पुरेशा पाण्याचा अभाव जाणवत असून जनावरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

सध्या हवामानातील वाढते तापमान आणि उपलब्ध जलस्रोतांची घटती पातळी लक्षात घेता परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. वेळेत कालव्याचे पाणी उपलब्ध न झाल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याबरोबरच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक बिकट होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित सिंचन विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि इंदापूर तालुक्यास खडकवासला कालव्याचे उन्हाळी आवर्तन त्वरित सुरू करून पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी करत भाजपा शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना अगदी धारेवर धरले होते.

शेतकरी, नागरिक आणि पशुधनाच्या हितासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.इंदापूर तालुक्यातील हजारो शेतकरी आणि नागरिकांचे जीवनमान या निर्णयावर अवलंबून असल्याने प्रशासनाने मानवीय दृष्टिकोनातून त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी भाजपचे जेष्ठ नेते प्रदीप गारटकर, प्रविण माने, आकाश कांबळे, गजानन वाकसे, मारुती वणवे, किरण गाणबोटे, राम आसबे, तेजस देवकाते, राजकुमार जठार, गणेश राऊत, अनिल पवार, अतुल शेटे पाटील, संजय शिंदे, वसीम बागवान, सुधाकर ढगे, यशवंत कचरे, सचिन शिरसट उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button