
लोकशासन-प्रतिनिधी : गणेश गुप्ते,भवानीनगर
भवानीनगर : शाळा म्हणजे जीवनाचा पाया आहे असे घोषवाक्य आहे. मात्र इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामधील प्राथमिक शाळेमध्ये या उलट चित्र पाहायला मिळत आहे. हा तालुका शालेय क्रीडा मंत्री यांच्या कार्यक्षेत्रात येतो. मात्र भवानीनगर मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोयी सुविधांचा अभाव आहे. याकडे शालेय क्रीडामंत्री लक्ष घालणार का ? असा सवाल पालक वर्ग करीत आहे.
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना यांच्या जागेमध्ये १९५७ सालापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना झाली. यामध्ये कारखान्यातील कामगार कॉलनी वरती कामगार राहत असल्याने या मुलांची शाळेसाठी सोय व्हावी या दृष्टीने या ठिकाणी शाळेचे व्यवस्था करण्यात आली.मात्र या प्राथमिक शाळेला स्वतःची जागा नसल्याने अनेक सोयी सुविधा करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच कारखान्याचे अनेक सभासद यांचे देखील मुले या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. या शाळेमध्ये पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरला जातो. मुले आणि मुली यांचे संख्या एकशे तीस असून मात्र गेल्या सहा वर्षापासून या ठिकाणी शौचालय, वॉशरूम नसल्याने मुला मुलींची कुचंबना होत आहे.
शासन निर्णयानुसार शाळेमध्ये १२० पट असेल तर एक शौचालय आणि तीन वॉशरूम असणे बंधनकारक आहे. मात्र गेल्या सहा वर्षापासून या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून पालक आणि शिक्षक यांनी ग्रामपंचायत प्रशासन, कारखाना प्रशासन, शिक्षणाधिकारी इंदापूर, यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालक वर्गातून होत आहे. याबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा पालक वर्गाने तक्रारी करून देखील आश्वासनाच्या पलीकडे काहीच हाती लागत नाही. ग्रामपंचायत प्रशासन आणि कारखाना प्रशासन टोलवाटोलवीचे काम करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र अशातच मुलांची गैरसोय होत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या आठ महिन्यापूर्वी सणसर चे ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील या ठिकाणी पाहणी केली होती. मात्र यानंतर देखील कोणत्याही प्रकारच्या हालचाल करण्यात आली नाही. या शाळेमधून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी चांगल्या पदावर ती काम करीत आहेत. या शाळेला स्वतःच्या जागा देण्यात यावी तसेच शौचालय आणि वॉशरूम नवीन बांधून देण्यात यावे असे मागणी पालक वर्गातून होत आहे . तसेच शालेय क्रीडामंत्री यांनी देखील या शाळेकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.