
लोकशासन-प्रतिनिधी , पुणे
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात इश्वरी भिसे या गर्भवती महिलेवर उपचार नाकारले व त्यानंतर उशिरा उपचार मिळाल्याने या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.दहा लाखांची अनामत रक्कम भरली नाही म्हणून पैशांमुळे रुग्णाचा जीव गेल्यामुळे रुग्णालयाविरोधात वातावरण पेटले असून राजकीय पक्षांकडून तसेच सामाजिक संघटना, संस्था, पुणेकरांकडून रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.विशेष म्हणजे भिसे यांचे पती भाजपच्या आमदारांचे स्वीय सहाय्यक असुन आमदारांच्या स्विय सहाय्यक असणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारची वागणूक रुग्णालय प्रशासना कडून मिळत असेल तर सर्व सामान्य रूग्णांनचा विचारच न केलेला बरा.
पुणे महापालिकेने सर्व खाजगी रुग्णालयांना तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना अनामत रक्कम भरण्याची सक्ती करू नका, अशा स्वरूपाची नोटीस महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने काढण्यात आली तर अनामत रकमेसाठी अशा प्रकारे अडवणूक केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्याचा इशारादेखील महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
…तर या टोल फ्री क्रमांकावर करा तक्रार
रुग्णालयांनी अनामत रक्कम भरण्याची सक्ती केल्यास किंवा वैद्यकीय नियमांचे पालन न केल्यास रुग्णांच्या नातेवाइकांनी १८००२३३४१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आहे.