
लोकशासन : प्रतिनिधी , इंदापूर
इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदे अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व स्त्रियांसाठी आरक्षीत करण्याची तरतुद केलेली असल्याने तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये दिनांक ०५ मार्च २०२५ ते दिनांक ०४ मार्च २०३० या कालावधीसाठी च्या सरपंच पदाचे आरक्षणा तहसिल निहाय वाटप केलेले आहे. त्यानुसार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये एकाच वेळी दिनांक ०५ मार्च २०२५ ते दिनांक ०४ मार्च २०३० या कालावधीसाठी ग्रामपंचायत निहाय सरपंच पद आरक्षण सोडत करण्यात यावी अशा सुचना जिल्हाधिकारी यांच्या कडून देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी यांनी तहसिलला निश्चित केलेल्या (अनुसूचित व बिगर अनुसूचित क्षेत्रा मधील ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने काढण्यासाठी तालुक्याच्या तहसिलदारांना प्राधिकृत केलेले आहे. तसेच या सोडतीमध्ये निश्चित करण्यात येणारे सरपंच पदाचे आरक्षण हे ०५ मार्च २०२५ ते ०४ मार्च २०३० या कालावधीत होणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी लागू राहणार असल्याने ०५ मार्च २०२० ते ०४ मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणा-या व निवडणूका न झालेल्या ग्रामपंचायती करीता २७ फेब्रुवारी २०२५ रोजी फेर आरक्षण काढण्यात आलेले आहे. त्यानुसार इंदापूर तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणूका या आरक्षणानुसार झालेल्या नाहीत. त्यामुळे ते आरक्षण कायम ठेवून उर्वरीत ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण काढण्याचा आदेश देण्यात आला आहे.
इंदापुर तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने २३ एप्रिल २०२५ ला दुपारी १२.०० वाजता स्टेट बैंक ऑफ़ इंडिया समोर वाघ पॅलेस शेजारी राधाई लॉन्स इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे येथे काढण्यात येणार आहे.