
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,भवानीनगर
विविध रोगांपासून संरक्षण मिळणे व त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेत जपानी मेंदूज्वर या आजारापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी बुधवार दिनांक १६/०४/२०२५ रोजी या दिवशी लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले. हे आयोजन आरोग्य विभाग जिल्हा परिषद पुणे, रावणगाव यांच्या अंतर्गत डॉ. सागर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या शिबिरात इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जपानी मेंदूज्वरची प्रतिकारक लस देण्यात आली. यामध्ये एकूण ३७६ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. आरोग्य विभाग रावणगाव उपकेंद्र स्वामी चिंचोली येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे असून आजारांपासून वाचवण्यासाठी आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेच्या शिशू गटाच्या पर्यवेक्षिका अर्चना जानकर व सहशिक्षिका मोनिका देवकाते यांच्या नियोजनाने कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.