
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा परिषद (माध्यमिक शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात चिंचोली येथील अनंतराव पवार विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि शाळांची गुणवत्ता सुधारणे आहे.
शाळेने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राबविण्यात आलेल्या या अभियानात तालुका स्तरावर ५०० पर्यंत विद्यार्थी संख्येच्या गटात सहभाग नोंदविला होता. या अभियानाअंतर्गत शाळा तपासणी आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी जे विविध उपक्रम राबविले गेले होते त्यांची उंची लक्षात घेता शाळेची निवड प्रथम क्रमांकासाठी करण्यात आली आहे.
या यशाच्या गौरवार्थ गुरुवार, दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
शालेय व्यवस्थापन समिती व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता शिंदे यांच्याकडून वेळोवेळी लाभणाऱ्या उपयुक्त मार्गदर्शनामुळे हे यश साध्य झाले आहे. या यशामुळे संपूर्ण शाळा परिवारात आनंदाचे वातावरण असून शाळेच्या कार्यक्षम नेतृत्वाचे व शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.