
लोकशासन- प्रतिनिधी : इंदापूर ग्रामीण
इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी एकत्र येऊन सर्व पक्षीय पॅनलची मोट बांधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न चालवले असतानाच काही ठिकाणच्या जागा वरून सर्व पक्षीय पॅनल मध्ये तेढ निर्माण झाला असल्याचे समजत आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.मात्र अंतिम निर्णय दादा, बापु व मामा जो घेतील तो मान्य असेल असे बहुतांश उमेदवारांनी सांगितले.मात्र आता काही जागा वरून पवार व जाचक यांच्यात तणाव निर्माण झाला असून अंतिम क्षणांत बोलणी फिस्कटली असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
निवडणूकी संदर्भात महत्त्वाची भूमिका घेण्यासाठी पृथ्वीराज जाचक यांच्या कडून कार्यर्कत्यांनची बैठक बोलवण्यात आली असून आज दिनांक २९ एप्रिल ला संध्याकाळी ६ वाजता लासुर्णे येथील जाचक पेट्रोल पंपावर हि बैठक होणार आहे.या बैठकीत कार्यकर्त्यांच्या सोबत संवाद साधुन कारखान्याच्या निवडणुकी संदर्भातील पुढील दिशा व भुमिका जाचक या बैठकीतुन मांडणार आहेत.त्यामुळे पृथ्वीराज जाचक यांच्या पुढील भुमिके कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असुन आज संध्याकाळी या बाबतीत स्पष्टता होईल.
पृथ्वीराज जाचक यांचा विश्वासघात केला !
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पृथ्वीराज जाचक यांचा विश्वासघात केला असून सर्वांनी एकत्र येण्याचे दाखवून जाचक यांना गाफील ठेवण्यात आल्याची भावना जाचक यांच्या कार्यकर्त्यांन कडून व्यक्त केली जात आहे.