
लोकशासन- प्रतिनिधी:संजय शिंदे,पुणे ग्रामीण
लोकशाही दिवस हे प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद वाढवण्यासाठी आणि दरी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम आहे. या दिवशी नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना थेट प्रशासनाकडे मांडता येतात, ज्यामुळे प्रशासनाला लोकांच्या गरजा आणि अपेक्षांची जाणीव होते आणि त्यानुसार कार्यवाही करता येते. तसेच शेतकरी आणि नागरिकांची छोटी छोटी कामे तालुक्याऐवजी गावातच मार्गी लागण्यास मदत होते, असे प्रतिपादन इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी केले.

लामजेवाडी ( ता.इंदापूर) येथे बुधवारी (दि.२१) आयोजित लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे निवडणूक नायब तहसीलदार विजय घुगे, पुरवठा निरीक्षक सपन गुड्डमवार, गटविकास अधिकारी सचिन खुडे, सहायक निबंधक संध्या कदम, सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगुडे,पंचायत समितीचे अमोल मेरगळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कारंडे, मंडल अधिकारी दीपक कोकरे, कृषी मंडल अधिकारी किसन पिसाळ, तलाठी अशोक कदम, सागर पवार,तलाठी देवरे, ग्रामविकास अधिकारी नागनाथ गर्जे, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका माधुरी राजपुरे, सरपंच शंकर राऊत, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हनुमंतराव वाबळे, माजी संचालक संतोष वाबळे, माजी सरपंच शितल धुमाळ, राहुल वाबळे, ज्ञानेश्वर वाबळे, ग्रामपंचायत सदस्य माऊली भोसले, माजी उपसरपंच सोमनाथ सवाणे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष पोपटराव राजपुरे आदी उपस्थित होते.
या लोकशाही दिनाला परिसराला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी पुरवठा विभागाचे ६९ अर्ज, रस्त्यांच्या अडचणींबाबतचे १६, महसूलसंबंधीत १६५, उत्पन्न दाखला १७ आणि रहिवाशी दाखला ६ अर्ज असे एकूण २६८ अर्ज प्राप्त झाले. तसेच या वेळी १० विद्यार्थ्यांना तहसीलदार बनसोडे यांच्या हस्ते उत्पन्न व रहिवाशी दाखल्यांचे वाटप करण्यात आले.तहसीलदार बनसोडे आणि गटविकास अधिकारी खुडे यांनी ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती सांगून त्याचे लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गोपाळ धुमाळ, माजी सरंपच राहूल वाबळे, कालीचरण भोईटे, महादेव सुर्यवंशी, गणेश बर्गे, रमेश बर्गे, प्रविण धुमाळ, गजानन घाडगे, तुषार बर्गे, शरद निगडे, पंढरीनाथ कदम, अक्षय कदम, प्रदीप ताटे यांनी परीश्रम घेतले. प्रास्ताविक गोपाळ धुमाळ यांनी केले. आभार महादेव सुर्यवंशी यांनी मानले.
इंदापूर तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या व सुमारे ५० किलोमीटर अंतर असलेल्या लामजेवाडी गावात लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी दोन महिन्यांपासून पाठपुराव करणाऱ्या पत्रकार गोविंद बर्गे, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ धुमाळ माजी सरपंच राहूल वाबळे यांचे तहसीलदार बनसोडे यांनी कौतुक केले.तसेच कार्यक्रमासाठी अतिशय नेटके नियोजन केल्या बद्दल शेटफळगढे ग्रामपंचायतीचे देखील कौतुक करीत कार्यक्रमाला मिळालेल्या चांगला प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केेले.