
लोकशासन – प्रतिनिधी मुंबई
आषाढी वारीनिमित्त करावयाच्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली असून वारकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वारीसाठी निघणाऱ्या मानाच्या पालख्यांच्या मार्गावरील सोयी सुविधा व यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेत मुसळधार पावसामुळे वारी मार्ग खराब झाला असल्यास त्या ठिकाणी मुरूम, खडी डांबरीकरण करून त्याची डागडुजी करावी, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोल मध्ये सवलत दिली जाईल, तसेच गतवर्षीप्रमाणे यंदाही वारीच्या मार्गावर आरोग्य शिबिरे, कार्डीऍक रुग्णवाहिका, आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. वाखरी येथे एक मॉडेल वारीतळ तयार केला जात असून वारीच्या वेळी व्हीआयपी गाड्या पंढरपूरला जाणार नाहीत यासाठी विशेष योजना आखण्यात येणार आहेत. वारीच्या मुक्कामस्थळावरील ६५ एकरात आता रेल्वेच्या जागेची भर पडणार असल्याने वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या वर्षी वारीदरम्यान झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना मदत केली जाईल, पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात यासाठी वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही यासाठी प्रयत्न करून, यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याने त्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जातील असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अभिजित पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पंढरपूर देवस्थान समितीचे प्रमुख गहिनीमहाराज औसेकर, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे विश्वस्त योगी निरंजनदास महाराज, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे तसेच विविध संतांच्या दिड्यांचे प्रमुख विश्वस्त तसेच धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.