योगेश चितारे यांना कोल्हापूर विद्यापीठाची भौतिक शास्त्र विषया मधील डॉक्टरेट ( पीएच. डी.) पदवी प्रदान

Spread the love

प्रतिनिधी : लोकशासन इंदापूर

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील जिरायती ग्रामीण भागातील कौठळी गावातील अल्पभूधारक गरीब शेतकरी कुटुंबा तील योगेश चितारे याला कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने भौतिकशास्त्र ( फिजिक्स ) या विषया मधील डॉक्टरेट ही पदवी दिनांक १८ मार्च २०२५ रोजी प्रदान करण्यात आली. इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ग्लोबल नेटवर्क फॉर मेडिकल हेल्थ प्रोफेशन अँड बायोथीक्स एज्युकेशनचे महासचिव डॉ. वेदप्रकाश मिश्रा, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या हस्ते डॉ. चितारे यांना पदवी प्रदान करण्यात आली.

कौठळी गावातील डॉक्टरेट ही पदवी मिळवलेले ते पहिलेच विद्यार्थी असून त्यांनी ही पदवी मिळवून आपल्या गावाच्या नावाबरोबर इंदापूर तालुक्याचे नाव देखील मोठे केले आहे.

डॉ. योगेश चितारे यांनी “सोल्युशन ग्रोथ ऑफ टंग्स्टन ऑक्साइड ऑन टू डिमेन्सिशनल टायटनेट अँड हेक्सानायोबेट नॅनोशिट फॉर फोटोकॅटॅलिटिक डाय डिग्रेडेशन” या विषयावरील प्रबंध सादर केला असून आत्तापर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर २० पेक्षा जास्त रिसर्च पेपर, ४ पेटंट, २ रिव्हिव पेपर, एक बुक चॅप्टर, व ४ कॉपीराईट प्रसिद्ध केले आहेत. डॉ. योगेश चितारे यांनी विविध द्विमितीय नॅनोशीट्सचे काचेवर डीपॉसिशन घेऊन त्यांच्या आधार वर नवनवीन थीन फिल्म्स तयार केलेल्या आहेत. सदर थीन फिल्म्सचा वापर हा पाण्यामधील घातक असणारे सेंद्रिय रंगाचे रेणू काढून टाकण्या साठी होणार आहे. त्यांना या संशोधना साठी मुख्य मार्गदर्शक डॉ. जयवंत गुंजकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर जगप्रसिद्ध वैज्ञानिक प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे व विद्यापीठा तील इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले आहे. डॉ. योगेशचे प्राथमिक शिक्षण कौठळी जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण हे नूतन माध्यमिक विद्यालय, कौठळी येथे झाले असून बारावी इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास ज्युनिअर कॉलेज, बी. एस्सी इंदापूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात झाले. एम. एस्सी पुण्यामधील फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाली. प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांनी पुढे काही दिवस नोकरी केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ पीएच. डी. करण्याचा निर्धार करून तो पुर्ण करून दाखवला. सन २०१९ साली त्याने कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात प्रवेश घेतला आणि ५ वर्षाहून अधिक काळ अविरत मेहनत करून त्याने उच्च दर्जाचे संशोधन करून पीएच. डी. मिळवली. संशोधन करत असताना त्यांना अनेक चढउतार यांना सामोरे जावे लागले. सुरवातीच्या काळात कोणतीही फेलोशिप नसताना, कुटुंबाची जबाबदारी पार पाडत खूप मेहनतीनं त्याने आपली डिग्री प्राप्त केली. या काळात त्याला त्याच्या सौभाग्यवती प्रिया यांनी अनमोल साथ दिली. आई वडील यांचा आशीर्वाद, बायकोची साथ, मार्गदर्शकांचे मार्गदर्शन, मित्रांचे सहकार्य, जिद्द, चिकाटी, कष्ट, प्रेरणा व महत्वाचे म्हणजे सातत्य या सर्व गोष्टींमूळे हे यश संपादन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, भारत सरकार, विद्यापीठातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button