अवैध वाळू उपसा प्रकरणात बारामतीतील दोघांना न्यायालयाची निर्दोष मुक्तता ! साक्षी व पुराव्यात तफावत; कोर्टाने सरकारी युक्तिवाद फेटाळला

Spread the love

लोकशासन- प्रतिनिधी : बारामती शहर

बारामती तालुक्यातील मेखळी येथे २०२० मध्ये घडलेल्या कथित अवैध वाळू उपसा प्रकरणात दोन आरोपींना बारामती सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे. न्यायमूर्ती एच. ए. वाणी यांनी सुनावलेला हा निकाल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

▪️ प्रकरणाची पार्श्वभूमी: ९ एप्रिल २०२० रोजी कर्‍हा नदी पात्रात जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने १०-१२ ब्रास वाळू उपसली जात असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर तत्कालीन तलाठी अश्विनी मगदूम व इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तेव्हा वाळू उपसणाऱ्यांनी, “तुम्हाला जे करायचंय ते करा,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात बाळासाहेब किसन बिचकूले व पोपट निकम (दोघेही रा. झारगडवाडी) यांच्यावर IPC कलम ३५३, ३७९, ३४ व खाण व खनिज अधिनियम कलम १५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

▪️ तपास व साक्षी:सरकारी पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये तीन प्रत्यक्षदर्शी, पंच साक्षीदार व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक लंगोटे यांचा समावेश होता.मात्र, खटल्यादरम्यान साक्षीदारांच्या साक्षीत अनेक तफावती आढळल्या. त्यात एकवाक्यता नव्हती, तर काहींनी विरोधाभासी साक्ष दिली.

▪️ बचाव पक्षाचा युक्तिवाद:आरोपी क्रमांक एक तर्फे अ‍ॅड. विशाल बर्गे यांनी पुराव्यातील उणिवा स्पष्टपणे कोर्टासमोर मांडल्या:घटनास्थळी वाळूचे मोजमापच घेण्यात आले नव्हतेआरोपीच्या ताब्यातून वाळू जप्त झाली नव्हतीफिर्यादीकडे गुन्हा दाखल करण्यास लेखी आदेश नव्हतास्थानिक तक्रारींचा अभावसाक्षींमध्ये विसंगतीत्यामुळे आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

▪️ निकाल व कायदेशीर बाजू:न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करत सरकारी युक्तिवादात विश्वासार्हता नसल्याचं नमूद केलं. परिणामी, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.आरोपी क्रमांक दोन तर्फे अ‍ॅड. राजेंद्र काळे यांनी काम पाहिलं.अ‍ॅड. राकेश तावरे व अ‍ॅड. राजेंद्र सोनावणे यांनी यामध्ये सहकार्य केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button